गेल्या ‘अनलॉक’पेक्षा यावेळी दिसले वेगळे चित्र स बाजारपेठेत ग्राहक आहेत, गोंधळ नाही
गेल्या 9 दिवसांपासून कडकडीत लॉकडाऊन असलेले औरंगाबाद शहर आज अनलॉक झाले. लॉकडाऊन नंतर शहरात गर्दीच गर्दी होत असल्याच्या यापूर्वीचा अनुभव असताना यावेळी मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठा सुरू होत्या पण पूर्वीसारखा गोंधळ दिसून येत नव्हता. जाधववाडी तसेच शहागंज या शहरातील महत्त्वाच्या भाजी मंडईत तर विक्रेते आणि ग्राहकांपेक्षा वर्दीधारी पोलिसांचीच गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसत होती. दरम्यान, शहरातील विविध भागात अॅन्टीजेन टेस्ट करून घेण्यासाठी व्यापारी तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रांगा लावलेल्या दिसत होत्या.
शहराच्या मुख्य रस्त्यांवरही पूर्वीसारखी गर्दी जाणवत नव्हती. जालना रोडवर वाहतूक सुरू होती. शहराच्या सीमा पोलिसांनी मोकळ्या केल्याने आणि अॅन्टीजेन टेस्टीही या ठिकाणी सोय नसल्याने पुन्हा एकदा शहरात बेधडक वाहतूक सुरू असल्याचे दिसले. शहरातील दुकाने सकाळी 7 वाजताच खुली झाल्याने आयुक्तांच्या 9 वाजेच्या आदेशाचा फज्जा उडाला. त्याच बरोबर आज कोणती दुकाने सुरू करावी याचेही स्पष्ट आदेश प्रशासनाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे टी.व्ही. सेंटर, गुलमंडी, कुभारवाडा, शहागंज, औरंगपुरा यासह गारखेडा परिसरातील सर्वच व्यावसायीकांनी दुकाने उघडल्याचे दिसून आले. परिणामी मुख्य बाजारपेठेत एकच होणारी गर्दी कमी झाल्याचेही दिसून आले. छोट्या व्यापार्यांनी नेहमीप्रमाणे जागा मिळेल तेथे दुकाने थाटली होती. गल्लीबोळात फिरून विकणारे सकाळपासून सक्रीय झाल्याने संपूर्ण अनलॉक झाल्याचे शहरात चित्र होते.
प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवला, त्याच बरोबर मनपानेही मोठ्या प्रमाणावर फौजफाटा रस्त्यावर उतरवला आहे, असे असले तरी प्रशासनाच्याच नियमावलीत गोंधळ असल्याने कारवाई कशी करावी यावर निर्णय होत नव्हता. कडेकोट बंदोबस्त असूनही कोणत्याही दुकानदाराला प्रश्न करण्याची मूभाच नसल्याचे दिसून आले. एकंदरीत अॅन्टीजेन टेस्ट आणि प्रमाणपत्राची अट वार्यावर राहिल्याचे चित्र आज तरी शहरात होते. दरम्यान, औरंगाबाद शहरात 40 हजार व्यापारी असून त्यांच्या कोरोना टेस्टसाठी महापालिकेने अवघे15 पथके तैनात केली आहेत.














